पुणे : पावसाने निरोप घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र आता थंडीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. दिवाळीनंतर राज्यात तापमानात चढउतार पाहायला मिळत असून काही ठिकाणी हवेत गारवा वाढल्याचे दिसत आहे. अशातच राज्यात हिवाळ्याला सुरवात होणार आहे असे संकेत मिळाले असतानाच पावसाचे सावट आले आहे.
आज राज्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. गुरुवारपासून राज्याच्या दक्षिण महाराष्ट्र भागापासून कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळी वारा आणि विजांसह 15 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, गडचिरोली, वाशीम, चंद्रपूरमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहिल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या आंध्र प्रदेश आणि तामिनाडू क्षेत्रावर सध्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होताना दिसत आहे. परिणामस्वरुप दाक्षिणात्य किनारपट्टी क्षेत्रामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एकिकडे राज्यात ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाहणारे वारे आणि पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरीकडे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे ही बाबसुद्धा नाकारता येत नाही.