पुणे : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. या संदर्भात रविवारी (दि.14) सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेणा-या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदानही मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्यसरकारकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रात पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे.
असा करु शकता अर्ज…
(1) पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
(2) ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.
(3) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
(4) अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
2. स्वतःचे आधार कार्ड
काय आहेत अटी….
– वय 60 वर्षे व त्यावरील जेष्ठांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
– महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक
– कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
– महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
या व्यक्तींना मिळणार नाही लाभ…
– ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
– ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमसरकारी सेवेत कार्यरत आहेत. तसंच, ज्यांना निवृत्तिवेतन मिळत आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे.
– ज्यांच्याकडे चारचाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. त्यांनाही योजना लागू नसणार आहे.
– प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी, ह्द् याशी संबंधित श्वसन रोग, मानसिक आजार इ.