पुणे : एसटी महामंडळाची लालपरी आता नव्या प्रवाहात आली आहे. राज्यातल्या वाड्या, वस्त्यांवर आजही ही लालपरी आपली चोख सेवा देते. मात्र मागच्या काही दिवसांत लाल परीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मात्र आता एसटीच्या ताफ्यात अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांत लालपरी आता नव्या रूपात अवतरणार असल्याचे समजते. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 14 हजार बस आहेत. मात्र, या बसेसची दूरवस्था झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अधिकृत ट्विटर हँडलवरुन नव्या कोऱ्या बसचे फोटो शेअर केले आहेत.
साधारणपणे ऑक्टोबरमध्ये 50 ते 100 नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशी संख्या आणि अपुऱ्या बसेस संख्येमुळे नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या नवीन बस खरेदीबरोबरच भाडेतत्वावर गाड्या घेण्यावर भर देण्यात येतो आहे. या धोरणानुसार लवकरच 5 हजारहून अधिक गाड्या एसटीच्या ताफ्यात येत आहेत. त्यापैकी 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. रोड टेस्टसाठी या बस अवतरल्या असून रोड टेस्ट झाल्यानंतर लवकरच या बस प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहेत.
एसटी महामंडळ अशोक लेलँड कंपनीकडून दोन हजार 500 स्वमालकीच्या डिझेलवर धावणाऱ्या बस खरेदी करणार आहे. या बस गाड्यांची मूळ प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हे विविध चाचण्यांद्वारे प्रमाणित केले गेले आहेत. तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथील कंपनीच्या कारखान्यात 10 सप्टेंबर रोजी त्याची अंतिम तपासणी केली जाईल. ऑक्टोबरमध्ये सुमारे 50 ते 100 बसेस आणि एसटीचा ताफ्यात दाखल होणार आहेत. तसेच नोव्हेंबरपासून 150 ते 300 बसेसचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटी श्रेणीतून प्रवास सुरू राहणार असल्याचे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.