पुणे : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता मुसळधार सुरु असलेला दिसत आहे. मंगळवारी काही ठिकाणी पाऊस झाला तर बुधवारी मुंबई, ठाणे, पुण्यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच रेल्वे सेवा, रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीचा इशारा दिला आणि आपत्कालीन उपाययोजना केल्या.
परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. पुण्यातील चारही प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रामध्ये 2 हजार 568 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांनी खबरदारीच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात ते सभा घेणार आहेत, पण या सभेवर पावसाचं सावट आहे. मुसळधार पावसानं आज पुण्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं रुप आल्याचं पहायला मिळतंय. नवी पेठ रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी टाकलेली माती पावसामुळे वाहून गेली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहर आणि उपनगरातील सर्व सार्वजनिक शाळांना दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले.