मुंबई : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? यावर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाचा मुख्यमंत्री होणारे हे स्पष्ट झालं आहे. अशातच साता-यातील गावावरुन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेतील तिढा सुटण्याची शक्यता दिसून येत आहे.
शिवसेना आमदारांची ही महत्त्वाची बैठक आज दुपारी वर्षा किंवा नंदनवनला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री जागा वाटप त्याचबरोबर महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भातही चर्चा होणार आहे.
शिवसेनेच्या वाट्याला 14 मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या कोट्यात आधीच्या मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांचाही सहभाग असणार आहे. तर काही माजी मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे. त्यांच्या जागी नवीन आमदारांनी मंत्री पदासाठी संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.