Maharashtra Election 2024 Voting : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 पासून राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.
राज्यातील 9 कोटींहून अधिक मतदार आज आपल्या मतदानाचा वापर करुन नवीन सरकार निवडतील. सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत.
राज्यात गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. प्रचार संपल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. सत्ता आपल्या ताब्यात राहावी यासाठी सर्वजण झटत आहेत. राज्यात मतदान वाढावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. राज्यात गैरप्रकार टाळण्यासाठी व परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदारांना सहजतेने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यादृष्टीने निवडणूक यंत्रणेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच वोटर्स ॲपवर मतदारांना आपला निवडणूक ओळखपत्राचा अंक टाकून किंवा स्वतःचे नाव किंवा मतदार नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे या ॲपवर आपले नाव मतदार यादीत शोधणे तसेच मतदान केंद्र याची माहिती सहजतेने मिळू शकते.