मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड करण्यासाठी बैठकांचे सत्र चालू झाले आहे. अशातच आज विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता कमालीची वाढली असून विविध चर्चांना सोमवारी उधाण आलं आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, या भोवतीच चर्चा फिरत आहेत. मावळत्या विधानसभेची मुदत आज (दि.26) अखेरीपर्यंत आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला व मंत्रिमंडळाचा राजीनामा देतील.
या राजीनाम्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेच्या दिशेने पावलं उचलली जातील. शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी, नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपाल त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीला वेग येईल.