मुंबई: मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) शिवसेना शिंदे (Eknath Shinde) गटातील मंत्र्यांनी आज (Devendra Fadanavis) बहिष्कार टाकत गैरहजेरी लावली. बैठकीला केवळ एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते. भाजपकडून होत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आली. या नाराजीची परिणाम मंत्रिमंडळाच्या बैठकीवर पडला. बैठक संपल्यानंतर नाराज मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले आणि तुम्ही जे करत आहात ते योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी कल्याण-डोंबिवलीतील ऑपरेशन लोटससंदर्भातही त्यांनी तक्रार मांडली. फडणवीसांनी या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंच्या समोरच संबंधित मंत्र्यांना खडे बोल सुनावले. गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले हे मंत्री या भेटीत सहभागी होते. फडणवीसांनी उल्हासनगरमध्येही अशाच प्रकारची घडामोड झाली असल्याचं सांगत शिंदे गटाच्या मंत्र्यांना फटकारलं. माहितीनुसार फडणवीसांनी विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रवेशांची यादीही यावेळी वाचून दाखवली. (Breaking News)

शिंदे गटाच्या नाराजीमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुरू झालेली सदस्यांची फोडाफोड हे मुख्य कारण आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवकांनी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि हा सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपने ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवत काही दिवसांपासून श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीय नगरसेवकांना संपर्क साधला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये संताप वाढत गेला.
ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या तेच उमेदवार भाजपमध्ये सामील होत असल्याने सेनेच्या मंत्र्यांत नाराजीचा सूर उमटला आहे. अनेक महत्वाचे निर्णय शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता घेतले जात असल्याची तक्रारही पुढे आली आहे. निधीचे वाटप आणि विकासकामांसाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी शिंदे गटाच्या मंत्र्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही म्हटलं जात आहे . संभाजीनगर, कल्याण–डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या भागांमध्ये भाजपने शिंदे गटाच्या नाराजीस कारणीभूत ठरणारे प्रवेश करून घेतल्याचा आरोप ठळकपणे समोर येत आहे. आगामी निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नसल्याचे मतही शिंदे गटातून व्यक्त होत असून त्यामुळे मंत्र्यांची नाराजी आणखी तीव्र झाली आहे.






