Ganpati Visrjan 2024 : राज्यभरात गणपती विसर्जनाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत असून भाविक बाप्पाला निरोप देताना दंगून गेले आहेत. मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जात असतानाच राज्यात अनेक ठिकाणी मात्र दुर्घटना घडल्या आहेत. बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पंढरपूर, परभणीतही दुर्घटना..
गणपती विसर्जन करताना चंद्रभागा नदीत एक जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रभागा नदीवरील अहिल्या पुलावरून गणेशमूर्ती विसर्जन करताना तोल जाऊन 40 ते 50 फूट उंचीवरून नदीत पडला आहे. मध्यरात्री एक वाजता ही दुर्दैवी घटना घडली असून पोलीस आणि नातेवाईकांकडून गणेशचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जना दरम्यान करपरा नदीमध्ये भागवत कल्याण अंभोरे (वय 13 वर्षे) मुलगा वाहून गेला आहे. महसूल व पोलीस प्रशासन मुलाचा शोध घेत आहे.
अमरावतीमध्ये ३ जण वाहून गेले..
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील इसापूर येथे गणपती विसर्जनावेळी दोघे पूर्णा नगर नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मयूर गजानन ठाकरे, अमोल विनायक ठाकरे अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दुसरीकडे दर्यापुर तालुक्यांतील दारापूर येथील गणपती विसर्जनात राजेश संजय पवार (वय, २७) हा युवक पाण्यामध्ये बुडाला आहे. जिल्हा शोध बचाव पथक आज पूर्णा नदीत पात्रात दाखल होणार असून शोध सुरू होणार आहे.
धुळ्यामध्ये सख्ख्या भावांचा मृत्यू
गणपती उत्सवाला दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणपती बुडवण्यासाठी गेले असता तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघा भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह आणखी एक मित्र विसर्जनासाठी गेला होता, मात्र सुदैवाने तो बचावला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. ओम पाटील व यश पाटील या दोघा दुर्दैवी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत, धुळे शहरातील बिलाडी परिसरामध्ये असलेल्या वारे नगर येथील हे दोघेही भावंड असून, गणपती बुडवण्यासाठी ते परिसरातील तलावात गेले असता ही घटना घडली आहे.