मुंबई : अमित शाह खोटं बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटं बोलत असतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो. तो ग्राहकाला फसवतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यापारी भेसळखोर असल्याचा आरोप केला आहे. यावरुन मोठा वाद पेटला आहे. संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना थेट व्यापाऱ्यांचा अपमान केल्याचं बोललं जात आहे.
अमित शाह महाराष्ट्राच्या दौ-यावर होते. वीर सावकर यांच्याबद्दल चांगले शब्द बोलावेत, असे उद्धव ठाकरे कॉंग्रेस किंवा राहुल गांधी यांना सांगू शकतात का, असे आव्हान देत सत्ता स्थापन करताना आम्ही अन्य कुणालाही संधी देणार नाही, असे म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सत्ता कुणाला द्यायची किंवा सत्तेपासून कुणाला लांब ठेवायचे, हे अमित शाह ठरवणार नाहीत, तर महाराष्ट्राची जनता ठरवेल. अमित शाह यांनी या महाराष्ट्रातील 40 आमदार विकत घेतले असतील, पण महाराष्ट्रातील 14 कोटी जनता विकत घेतलेली नाही.
दरम्यान, 370 कलमाला कोणीही विरोध केलेला नाही. काही भूमिका मांडल्या असतील. 370 कलमाला शिवसेनेने विरोध केला नसून, उलट पाठिंबा दिला आहे. 370 कलम हटवून काश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले? हे सांगा म्हणावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मात्र, त्याचवेळी त्यांनी व्यापारी खोटं बोलतात, असं विधान करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, “महाराष्ट्रातील 1 कोटी व्यापाऱ्यांच्या वतीने मी त्यांच्या बेजबाबदार विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. त्यांनी नुसतं भेसळ करतात नाही तर खोटं बोलतात असंही म्हटलं आहे. आता कोण रोज काय खोटं बोलतात यात आम्हाला जायचं नाही. पण या देशाची, राज्याच्या अर्थव्यवस्था व्यापाऱ्यांच्या योगदानावर चालत असते. नुसतं करच नाही तर सर्वाधिक रोजगार देण्याचं कामही व्यापारी करतात. अशात त्यांना भेसळखोर म्हणणं, खोटारडे, फसवणारं म्हणणं. तुम्ही आम्हाला काय शिकवत आहात? तुम्ही जबाबदार राजकारणी असून, जबाबदारीने बोललं पाहिजे.
तुम्ही राजकारणावर बोला आणि व्यापाऱ्यांवर बोलण्याच्या भानगडीत पडू नका. प्रत्येक क्षेत्रात एक ते दोन टक्के चुकीचे लोक असतात, त्याप्रमाणे काही व्यापारी असतील. यासाठी कायदा असून, सरकार कारवाई करत असतं. तुम्ही सरसकट असं व्यापाऱ्यांना बोलणं योग्य नाहीयेय, यावर मी निषेध करत आहे.