छत्रपती संभाजीनगर : लहान भाच्यांची व शेजारील मुलांची खेळण्यावरून भांडणे झाली असता ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मामाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी (ता.५) घडली आहे. तर उपचारादरम्यान मामाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दशरथ अंबादास रोकडे (वय ४० रा. मोतीवाला कॉलनी) असे मृत्यू झालेल्या मामाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांमध्ये खेळण्यावरून रविवारी भांडण झाले. हे भांडण मोठ्यांपर्यंत पोहोचले. बहीण उषा हातागळेला भांडणाऱ्या शेजारच्या महिलेला समजावून सांगण्यासाठी दशरथ रोकडे हे तेथे गेले होते. तेव्हा दशरथ रोकडे यांना संबंधित महिला व इतर तरुणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये दशरथ बेशुद्ध पडले होते.
दरम्यान, रोकडे यांना उपचारासाठी तातडीनं चिकलठाणा येथील मिनी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.