रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात होत आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती हा सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, अशातच या कार्यक्रमाला जाणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बसचा भीषण अपघात झाला असून ती बस 20 फूट खोल दरीत कोसळली आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात धनसे क्रीडांगणावर वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो बसेस लाडक्या बहिणींना आणण्यासाठी जातात. त्यादरम्यान, श्रीवर्धन तालुक्यातील काही लाडक्या बहिणींना घेऊन येत असताना मांजरोने घाटात एका बसचा अपघात झाला.
या अपघातामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत. ही बस म्हसळा येथून माणगावकडे येतं असताना बाजूच्या दरीत घसरल्याने हा अपघात झाला आहे. जखमी झालेल्या 8 महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीतीही जीवीतहानी झालेली नाही. एसटी चालक हे नवीन असल्याने मुख्य वळणावरील अंदाज आला नसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.