मुंबई : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नव्याने चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. मात्र, आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, खरंच अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
आदिती तकटरे यांनी नेमकं काय सांगितलं?
लाडकी बहीण योजने जवळपास दोन कोटी 34 लाखाच्या जवळपास महिला लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रुटनी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे. या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही. मात्र मी जेव्हा मंत्री होते, त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, महायुती सरकारच्या शपथविधी सभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजना’ कायम राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. सर्व बाबी तपासून आगामी अर्थसंकल्पात त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्यावर विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले होते.