Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला चांगलाच धोबीपछाड दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आलबेल आहे हे दिसून येत होतं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडी पुन्हा आता एका नव्या ताकदीने दिसेल. अशी चर्चा होत असतानाच मात्र आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली आहे.
उमेदवारांची घोषणेआधी चर्चा करायला हवी होती
विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचे परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्याने काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त केली गेली आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडी असल्याने उमेदवारांची घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
‘या’ दोन जागेसाठी काँग्रेस आग्रही
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले असून त्यांना ठाकरे यांची भूमिका रुचलेली नाही. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, लोकसभा जागावाटपाप्रमाणेच उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची लाट दिसून येत आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यातच कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता . यापूर्वी 15 जूनला मतदान होणार होते, पण शाळांना सुट्टी असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी राज्यातील विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षकांच्या संघटनांकडून करण्यात आली होती.
7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
दोन आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मतदानाची तारीख पुढे ढकलावी ही मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक लांबणीवर टाकली. त्यानंतर नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता 26 जूनला मतदान तर मतमोजणी 1 जुलैला करण्यात येणार आहे. 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
निवृत्त होणारे सदस्य
- मुंबई शिक्षक : कपिल पाटील (लोकभारती)
- मुंबई पदवीधर : विलास पोतनीस (शिवसेना ठाकरे गट)
- नाशिक शिक्षक : किशोर दराडे (अपक्ष)
- कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप)