पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना, पनवेलच्या नेरे भागात बेकायदेशीररीत्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीतील बैल एका तरुणाच्या अंगावर गेल्याने तो यात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी शर्यतीचा आयोजक सुरज पाटील व बैलगाडा चालक या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असताना, पनवेलच्या नेरे भागात राहणाऱ्या सुरज पाटील याने १९ मे रोजी कुणाचीही परवानगी न घेता बेकायदा नेरे भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. ही शर्यत पाहण्यासाठी अंबरनाथ येथून आलेला जयेश जाधव (१८) या तरुणाच्या अंगावर शर्यतीतील एक बैल गेल्याने त्याच्या डोक्याला दुखापत होऊन तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पनवेलच्या नेरे भागात बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.