रत्नागिरी : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, आत्महत्या यांसारख्या घटना तर घडत आहेत. असे असताना आता रत्नागिरी शहराजवळील डी मार्ट येथील रेल्वे पुलावरून उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (15 ऑगस्ट ) सायंकाळी घडली आहे.
सुरेंद्र राजेंद्र किर (वय, 38) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र किर याला दारुचे व्यसन होते. सुरेंद्र हा दुपारच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या हेतूने शहरातील कुवारबाव येथील डी मार्टच्या जवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर आला. तिथून त्याने बहिणीला फोन लावून मी आत्महत्या करणार असल्याची कल्पना दिली होती. पुलावर येऊन त्याने थेट पुलावरून जाणाऱ्या रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली. मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच आजुबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती मिळताच तातडीने पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
घटनास्थळी मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने पोलीसांकडून मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले. याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.