पनवेल : कळंबोलीत राहणाऱ्या एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेतील आरोपी कळंबोलीत तर पीडित तरुणी तळोजा येथे राहण्यास आहे.
वर्षभरापूर्वी दोघांची ओळख झाली होती, त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यादरम्यान आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला कळंबोलीतील रोडपाली गाव येथील रो-हाऊसमध्ये नेऊन तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान त्याने शारीरिक संबंध करतानाचे फोटो काढले. त्यानंतर गत महिन्यामध्ये आरोपीने पीडित तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.
पीडित तरुणीने त्याच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच त्याच्यासोबतचे तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पीडित तरुणीने कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.