रायगड : रायगडच्या खालापूरमध्ये दोन दिवसांपूर्वीच धरणात बुडून ४ तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच अलिबाग तालुक्यात दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. तलावामध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
या दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम बचाव पथकाकडून सुरू आहे. खालापूरच्या धरणामध्ये चार तरुण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आज दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अथर्व हाके आणि शुभम बाला अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील पोहायला गेलेले दोन तरुण तलावामध्ये बुडाली आहेत. तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलं पाण्यात बुडाली. बेपत्ता मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे तसेच बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातून विविध बचाव पथकांना पाचारण करण्यात आले असून अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आले तर शुभमचा मृतदेह शोधण्याचे युद्धपातळीवर काम सुरू आहे.
खालापूर तालुक्यात धरणामध्ये बुडून ४ तरुणांचा मृत्यू
रायगडमधील खालापूर तालुक्यामध्ये धरणामध्ये बुडून ४ तरुणांचा मृत्यू झाला होता. वावर्ले गावच्या पोखरवाडी येथे २१ जून रोजी ही घटना घडली होती. सत्य साईबाबा ट्रस्टकडून हे धरण बांधण्यात आले होते. या धरणामध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. चारही तरुण मुंबईमधील रिझवी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.