रसायनी(रायगड) : धावरी नदीत बुडून जांभिवलीतील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरव विजय गावडे (५) व आराध्या संजय गावडे (५) अशी त्यांची नावे असून, हे दोघे सख्खे चुलत भाऊ-बहीण होते. ते दोघे सकाळी त्यांची आई व काकी यांच्यासोबत नेहमीप्रमाणे नदीवर कपडे धुण्यास गेले होते, आई-काकी कपडे धुवत असताना या दोघांनी पाण्यात आंघोळ केली, कपडे धुऊन झाल्यावर ते आई-काकी सोबत घरी आले. मात्र, त्यानंतर ते बराच वेळा घरी किंवा शेजारी कुठेच दिसतं नसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान हे दोघे नदीवर गेले असावेत याचा अंदाज घेत घरची मंडळी नदीवर गेली असता त्यांना आराध्या पाण्यावर तरंगत असताना दिसली. तसेच नदीत उतरून आरवचा शोध घेत असता तो पाण्यात चिखलात अडकल्याचे निदर्शनास आले. त्याला त्वरित चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.