पनवेल: कामोठे बसस्टॉपजवळ पुण्याच्या लेनवर एक व्यक्ती रस्त्याच्या मध्ये उभा राहून वारंवार वाहनांच्या पुढे झोकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. या वेळी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी हे दृश्य पाहताच त्यांनी तातडीने त्या व्यक्तीकडे धाव घेतली व हायवेवरून बाजूला नेले. दरम्यान सदर व्यक्तीने ‘मला जीव द्यायचा आहे, मला सोडा’, असे वारंवार पोलिसांना सांगितले. तसेच तो कळंबोली येथील रहिवासी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
वाहतूक पोलिसांनी या व्यक्तीला महामार्गावरून बाजूला सुरक्षित ठिकाणी आणले व कारण विचारले असता, त्याने माझ्या मुलांसोबत भांडण झाले असून मला जीव द्यायचा आहे, मला जिवंत राहायचे नसल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी या व्यक्तीला धीर देऊन त्याच्या पत्नीला फोन करून बोलावून घेतले व त्यांना तिच्या स्वाधीन केले. पोलीस उपनिरीक्षक संजीव शिंदे, पोलीस हवालदार संजय गावडे, प्रफुल पोकळे, सुरेश झिंजे या वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले असून, या साऱ्यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.