पनवेल : तळोजात मंगळवारी अपहरण झालेल्या हर्षिका शर्मा (२ वर्ष १० महिने) या चिमुकलीची हत्या तिच्याच घरासमोरील रहिवाशाने केल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या शेजाऱ्याने भांडणाच्या रागातून हर्षिकाची हत्या करून बॅगेत कोंबलेला तिचा मृतदेह शर्मा यांच्या घरातच लपवला होता. गुरुवारी (दि . २७) पोलिसांनी हे उघडकीस आणल्यावर हर्षिकाच्या आईवडिलांच्या आक्रोशाने तळोजावासीय सुन्न झाले.
आरोपी मोहम्मद मजीर वझीरची पत्नी आणि हर्षिकाच्या आईमध्ये नेहमी वाद होत असे. यामुळे आरोपीचा हर्षिकावर राग होता. तसेच ऑनलाईन जुगारात पैसे गमावल्याने हर्षिकाचे अपहरण करून तिच्या वडिलांकडून खंडणी उकळण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. मात्र, आपले बिंग फुटण्याच्या भीतीने आरोपीने चिमुरडीची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह तिच्याच घरातील टॉयलेटच्या सज्जावर बॅगमध्ये भरून ठेवला होता. मृत हर्षिका आई-वडील आणि मोठ्या भावासह तळोजा गावातील देवीचा पाडा भागातील माऊली कृपा बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होती.
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास इमारतीच्या गॅलरीत खेळत असताना आरोपी मोहम्मदने हर्षिकाला आपल्या घरामध्ये आणले आणि बुटाच्या लेसने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने रेग्झीन बॅगमध्ये तिचा मृतदेह भरला. हर्षिका अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तळोजा पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी तक्रार केली. यामुळे आरोपीला तिच्या मृदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वेळ मिळाला नाही. शर्मा कुटुंबीय हर्षिकाला शोधण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी शर्मा कुटुंबीयांचे घर उघडे असल्याचा फायदा घेऊन आरोपीने मुलीचा मृतदेह बॅगमध्ये भरून त्यांच्याच टॉयलेटच्या सज्जावर ठेवत पळ काढला.
बुधवारी रात्री उशिरा हर्षिकाच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरातील बाथरूमच्या वरच्या भागात असलेल्या बॅगेतून दुर्गंधी येऊ लागली, त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये हर्षिकाचा मृतदेह आढळून आला. तळोजा पोलिसांनी हर्षिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर तळोजा पोलिसांनी व गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने तपासाला सुरुवात केली. हर्षिकाचा मृतदेह असलेली बॅग घरासमोर राहणाऱ्या मोहम्मद मजीर वझीरची असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी संशयाच्या आधारावर आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली, मात्र पोलिसांचा दट्ट्या पडल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.