रायगड : रायगड जिल्ह्यातील महाडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. तीन जणांचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाबळेश्वर येथून हे तीन मित्र फिरण्यासाठी महाडला आले असता ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिलावर नालबंद, जहिद पटेल आणि मुनावर नालबंद अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
महाड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सव येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या तीन पर्यटकांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सव येथील गरम पाण्याचे कुंड हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या कुंडांवर राज्यभरातून अनेक पर्यटक भेट देतात. महाबळेश्वर येथून आज पर्यटनासाठी आलेले तीन पर्यटक या गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी आले होते.
मात्र, हे कुंड पाहायला जाण्यापूर्वी येथील सावित्री नदीत पोहण्याचा मोह तिघांना आवरला नाही. त्यामुळे गरम पाण्याचे कुंड पाहण्यापूर्वी तिघेही सावित्री नदीत पोहोण्यासाठी उतरले. त्यावेळी तिघेही नदीपात्रात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक व प्रशासनाच्या मदतीने शोधमोहिम राबविण्यात आली असून तिघांचेही मृतदेह बचाव पथकाला आढळून आले आहेत. दरम्यान, या तिन्ही पर्यटकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी पंचनामा करुन मृत्यूची नोंद केली आहे.