नवी मुंबई : एपीएमसीतील एकता नगर झोपडपट्टीत गांजाची विक्री करणाऱ्या दोन महिला व एक पुरुष असा तिघांची एपीएमसी पोलिसांनी धरपकड केली आहे. मखलान पुत्तन खान (३२) रशीदा समसुद्दीन शेख (२३) व दौलत रफीक दरोगे (२६) अशी या तिघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ३७ हजार रुपये किमतीचा गांजाचा साठा जप्त केला आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एन. व्ही. महाडिक, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, काळे व त्यांचे पथक सोमवारी दुपारी एपीएमसी मार्केटमध्ये गस्त करत असताना एकता नगर झोपडपट्टीतील एका झोपडीमध्ये काही पुरुष ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने संशयावरून या झोपडीवर छापा मारला असता तेथे एक पुरुष आणि दोन महिला समोरील सफेद गोणीवर पाने, फुले, काड्या, बिया, बोंडे असे संलग्न असलेला गांजा कागदावर ठेवून त्याच्या पुड्या बांधत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेला ६ किलो ८३५ ग्रॅम वजनाचा १ लाख ३७ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.