रत्नागिरी : राज्यात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढतंच जाताना दिसत आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण ताज असतानाच राज्यात असेच अनेक प्रकार समोर आले. अशातच नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या २० वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रत्नागिरीमध्ये घडली आहे. या घटनेने रत्नागिरीत एकच खळबळ उडाली असून सरकारी रुग्णालयातील नर्सेसनी या घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे तरुणीवर लैंगिक अत्याचारानंतर ती बेशुद्धावस्थेत आढळून आली आहे. तिला आता पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.
अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त..
रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. नर्सिंगचं शिक्षण घेणारी २० वर्षांची तरुणी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली होती. कॉलेजला येण्यासाठी निघालेल्या या तरुणीवर भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे रत्नागिरीत संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सरकारी रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे.