पालघर : पालघरमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. माय-लेकीची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह नाल्यामध्ये फेकून दिल्याची घटना समोर अली आहे. पालघर तालुक्यातील सावरे गावामध्ये ही घटना घडली. माय-लेकींचे मृतदेह नाल्यामध्ये तरंगताना दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस तपासामध्ये या दोघींची हत्या झाल्याचे आता समोर आले आहे. या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, यामधील तिसऱ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या सावरे गावाजवळील एका नाल्यामध्ये दोन जणांचे मृतदेह सोमवारी दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. गावातील नागरिकांना तलावामध्ये दोघींचे मृतदेह दिसले त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी यासंबधी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह बाहेर काढले. तर ते मृतदेह वाणीपाडा येथील सुष्मिता प्रवीण डावरे यांचा असल्याचे समोर आले. सुष्मिता यांच्यासोबत त्यांच्या मुलीचा मृतदेह देखील हत्या करून दगडाला बांधून या नाल्यामध्ये फेकण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
मृतदेह दगडाला बांधून नाल्यामध्ये फेकले..
मनोर पोलिसांनी दोघींचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना सुष्मिता डावरे यांच्या दीरावर संशय आला. पोलिसांनी संदीप डावरे याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. त्याने दोघींची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाला बांधून नाल्यामध्ये फेकल्याचे कबूल केले. विशेष म्हणजे या हत्याकाडांमध्ये संदीपची बहीण सुमन देखील सहभागी होती. पोलिसांनी तिला देखील अटक करण्यात आली आहे. एक आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध धेत आहे.
हत्या करण्यात आलेल्या सुष्मिता डावरे या आपल्या पती आणि दीड वर्षांच्या मुलीसोबत शेतघरामध्ये राहत होत्या. जमिनीच्या वादातून त्यांची आणि मुलीची हत्या करण्यात आली. आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ३१ ऑगस्टला सुष्मिता आणि संदीप यांच्यामध्ये जमिनीवरून वाद झाला होता. सुष्मिता रात्री फोनवर बोलत होत्या. त्यावेळी आरोपीने पाठीमागून तिच्यावर हल्ला करत हत्या केली. त्यानंतर तिच्या मुलीची देखील हत्या केली. दोघींचे मृतदेह पिशवीमध्ये टाकून त्याला दगड बांधून त्याने नाल्यामध्ये फेकले.