सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय ३२) असं मृत तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत उर्फ सागर हा कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. मंगळवारी त्याचा मृतदेह सासरवाडी येथील एका नर्सरीत आढळून आल्याची धक्कदायक बाब उघड झाली. आपल्या भावाची त्याच्या सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन हत्या केली असा आरोप मृत वसंत भगे याच्या भावाने केला आहे. यासंदर्भात त्याने पोलिस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल केली.
विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले..
वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वसंत भगे याला त्याची पत्नी नुतन शंकर गावडे हिने सोमवारी रात्रीच्या सुमारास आडेली सातेरी गाळू येथे राहत्या घराजवळ बोलावून घेतले. संशयित आरोपींनी वसंतला जीवे मारण्यासाठी त्यांच्या घराच्या कंपाऊंड भोवती विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले. वसंत हा पत्नीच्या बोलवण्यावरून सासुरवाडीला गेला असता, त्याचा स्पर्श या विद्युत तारांना झाला. यामुळे शॉक लागून वसंतचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पती आणि पत्नी यांच्यात नेहमी व्हायचे वाद..
दरम्यान, वसंत आणि त्याची पत्नी नुतन या दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. याच वादातून ही हत्या केली असावी, असा संशय मृत तरुणाच्या भावाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी वसंत भगे याची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.