बोईसर : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक तीन या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बारमध्ये चक्क अळ्या आढळल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून हा मिलेट्स बार दिला जातो. मात्र हा खळबळजनक प्रकार उघड होताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. परिणामी शालेय पोषण आहारच विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला असल्याचा दावा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केला जात आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या योग्य पोषणासाठी, शरीरात क्रयशक्ती वाढावी, त्यांना कुपोषणाची लागण लागू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही दशकांपूर्वी पोषण आहार योजना सुरू केली. पण शिक्षण विभागाचे अधिकारी व पुरवठादार यांच्या मिलीभगत असल्यामुळे या योजनेतील गैरप्रकाराला ऊत आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या २ हजार ३७१ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुलांना देण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बारमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून जिवंत अळ्या आणि बुरशी आढळल्याच्या तक्रारी आल्या करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन अनेक शाळांनी आपल्या वरिष्ठांना कळवलेही होते. तरीही मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या फूडचे वाटप सुरूच आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी, गरीब मुलांच्या जीविताशी जीवघेणा खेळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुरू असल्याची टीका करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडचा पुरवठा मे. इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रा.लि., मुंबई या कंपनीतर्फे करण्यात येतो. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण २ लाख ७५ हजार २९१ विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येत आहे. अळ्या आणि बुरशी असलेला पोषण आहार पुरवून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
याप्रकरणी आनंद लक्ष्मण चंदावरकर, विद्यालय खानिवली, जिल्हा परिषद शाळा चिंचणी नंबर ३, अशा अनेक शाळांनी आपल्या शाळेत मिळत असलेला हा आहार निकृष्ट दर्जाचा व खराब असल्याचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळवले आहे, पण आजही या आहाराचा पुरवठा सुरूच आहे. मिलेट न्यूट्रेटिव्ह बारचा पुरवठा करण्याकरिता संबंधित पुरवठादारास पुरवठा वितरण आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी अचूक व वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्याच्या सूचना पुणे शिक्षण संचालकांनी दिल्या असताना त्याच ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी पालक रजनीकांत पाटील यांनी केली आहे.
याप्रकरणी पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मेटेकर यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणचे नमुने गोळा करून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत, तसेच अन्न औषधे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील या घटनेतील नमुने तपासणीसाठी गोळा करून प्रयोगशाळेत पाठवून दिले आहेत.