उरण: वेस्टर्न कमोडच्या नावाखाली जेएनपीए बंदरातून शारजात पाठविण्याच्या तयारीत असलेल्या एका कंटेनरमधून १० कोटी किमतींचा ९.६ टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली.
जेएनपीएच्या सेझमधील सुरेश्वर सीएफएसमध्ये वेस्टर्न कमोड नावाने एक ट्रक कंटेनर मालाची निर्यात करण्यासाठी आला होता. हा कंटेनर माल शारजा येथील एका कंपनीत पाठविण्यात येणार होता. निर्यातीसाठी आलेल्या कंटेनरमधील मालाची न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या एसआयआयबीच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली होती. त्यानंतर सीमा शुल्क दिलेला कंटेनर जेएनपीए अंतर्गत विभागाने निर्यातीसाठी परवानगी असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) बंदराकडे रवाना झाला.
मात्र, अर्ध्या तासाच्या वाहतुकीदरम्यान सीमा शुल्क विभागाने तपासणी करून परवानगी दिलेला वेस्टर्न कमोड मालाच्या सीलबंद कंटेनरची माफियांच्या टोळीने अदलाबदली केली. ही खबर न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी वेळ न दवडता शिताफीने जहाजांवर चढविण्याच्या तयारीत असलेल्या कंटेनरची कसून तपासणी करत ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक अक्षय भाऊसाहेच आणि ट्रक-कंटेनरचालक गणेश मुखधरे यांना अटक केली. तर निर्यातदार, मालक फरार झाले आहेत. न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.