सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुडाळ तालुक्यातील भडगाव येथे पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पत्नीचा खून करून पती फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भडगाव येथे बाहेर गावावरून कामानिमित्त आलेल्या ओमप्रकाश बादल सिंग (संशयित आरोपी) याने आपल्या पत्नीचा रेणुका ओमप्रकाश सिंग हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आवळेगाव दूरक्षेत्राचे मंगेश जाधव इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, पती खून करून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कामानिमित्त हे दांपत्य गेल्या सात महिन्यापासून भाड्याने राहत होते. याबाबत स्वतः संशयित आरोपी ओम प्रकाश बादल सिंग याने कुडाळ येथे राहत असलेल्या आपल्या मुलीला फोन करून मी माझ्या पत्नीचा खून केला आहे असे सांगितले. यानंतर मुलीने भडगाव येथे घटनास्थळी जाऊन पाहिले असता आपली आई मृतावस्थेत आढळल्याने तिने आरडाओरड केली. तेव्हा स्थानिकांनी या ठिकाणी पाहणी करत सदरील घटना पोलिसांना कळवली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत.