जव्हार : पालघर जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनींने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शुभांगी रामदास पागी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
जून महिन्याच्या शेवटी शाळा व आश्रम शाळा सुरू झाल्या. मात्र आश्रम शाळा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत एकट्या जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेत १० विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याचे शासकीय आकडेवारीनुसार उघड झाले आहे. आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे; या हेतूने शासनाने आदिवासी आश्रम शाळेची निर्मिती केली. आश्रम शाळा सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात आदिवासी मुलांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. एका आश्रम शाळेत ५०० ते १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र आलीकडे आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे आणि ही चिंताजनक बाब आहे.
१० विद्यार्थ्यांचे मृत्यू..
जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या देहरे, पलसुंडा, साकुर, विनवल, खुडेद अशा अनेक आश्रम शाळेत १० विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आश्रम शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. यात कन्या आश्रम शाळा साकुर येथील दहावीच्या वर्गात शिकणारी शुभांगी रामदास पागी (वय १८) या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र तिने टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण मात्र समोर आले नाही. याप्रकरणाचा पोलिस तपास करत आहे.