सिंधुदुर्ग : नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. परंतु आता हा पुतळा कोसळला असल्याची, माहिती समोर येत आहे. पुतळा का कोसळला यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं.
याबद्दल आम्हाला दु:ख; आमदार वैभव नाईक
आमदार वैभव नाईक याबाबत की म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता. ज्यावेळी हे काम सुरू होते, त्यावेळीच स्थानिक लोकांनी सुद्धा या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे या तक्रारींकडे दुर्लक्ष केलय गेलं. जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा अजून ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करु. असा इशारा नाईक यांनी दिला.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते पुतळ्याचे अनावर..
राजकोट किल्ल्यावर अनावर करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 35 फुटांचा होता. मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलाने सुद्धा आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते..