अलिबाग : रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील पोलीस सायबर सेल. आणि मीडिया सेलच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आक्षेपार्ह व दोन समाजात तेढ निर्माण करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याऱ्या अज्ञात व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस दलाकडून समाजमाध्यमांवरील संदेशांवर नजर ठेवण्याकरिता सोशल मीडिया सेल स्थापन करण्यात आलेला आहे. त्याद्वारे सोशल मीडियावर निवडणुकीच्या अनुषंगाने आक्षेपार्ह पोस्ट मिळून आल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी समाज माध्यमांवरील संदेशांवर नजर ठेवत असताना एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आढळून आली. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य असल्याचे आढळून आले.