सिंधुदुर्ग : आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण असल्यामुळे राज्यभरामध्ये मोठा उत्साह दसून येत आहे. मात्र सिंधुदुर्गमध्ये या सणादिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. मालवणमध्ये मासेमारी बोट बुडून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचे देखील मृतदेह सापडले असून हे सर्व खलाशी आचराचे असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटून ही बोट समुद्रात पलटी झाली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले. यामधील ३ खालाश्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.
या चार खलाशांपैकी एक खलाशी पोहत पोहत समुद्रकिनारी पोहचला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर समुद्रात बुडालेल्या तिन्ही खलाशांचा शोध घेण्यात आला आहे. या तिन्ही खलाशांचे मृतेदह सापडले असून त्यांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाबाहेर खलाश्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली असल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेमध्ये सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम आडकर यांचा मृत्यू झाला असून अपघातग्रस्त बोट गंगाराम आडकर यांचीच होती. आडकर हे चौके विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. या घटनेमुळे आडकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.