ठाणे: एकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या केल्याप्रकरणी आरोपी आकाश पवार याला ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. अग्रवाल यांनी दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भरदिवसा आणि भर वाहतुकीत ४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ माजली होती.
या प्रकरणातील मिळालेल्या माहितीनुसार, ठाणा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्राची झाडे या मुलीवर आकाश पवार याचे एकतर्फी प्रेम होते. त्यासाठी वारंवार त्रास देणाऱ्या आकाशला तिने प्रत्येक वेळी नकार दिला होता. यामुळे त्याच्या मनात राग होता. घटनेच्या दिवशी मुंबईकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या पूर्वद्रुती महामार्गावर ठाणे आरटीओसमोरील महामार्गावरून जाणाऱ्या प्राचीला आरोपी आकाशने गाठले. तिने पुन्हा नकार दिल्याने आकाश याचा संताप अनावर झाला. त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने प्राचीवर १३ वार केले. त्यात प्राचीचा मृत्यू झाला. भर रस्त्यात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. आरोपी आकाश पवार याला पोलिसांनी ५ ऑगस्ट २०१८ रोजी अटक केली.
त्याच्याविरोधात ठाणे सत्र न्यायालयात ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी नौपाडा पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, साक्षीदार प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणात सरकारच्या वतीने ए.पी. लाडवंजारी यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी यावेळी भक्कम पुरावे सादर करताना २१ साक्षीदारही तपासले. त्यांच्या जबाबात समोर आलेला घटनाक्रम, पोलिसांनी मिळवलेले सीसीटीव्ही फुटेज यामुळे आणि आरोपी आकाश पवार याने नोंदवलेला विशेष जवाब लक्षात घेत न्यायमूर्ती ए. बी. अग्रवाल यांनी याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवले. सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपी आकाश पवार याला आजीवन कारावासाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड १२ डिसेंबर २०२४ रोजी ठोठावला आहे. न्यायमूर्तीनी निकालात दंडाची ५० हजार रुपये रक्कम न भरल्यास आरोपीला एक वर्षाची अतिरिक्त कैद भोगावी लागणार असल्याचेही नमूद केले.