पेण : पेण पोलिसांच्या सतर्कमुळे एका तरुणाचे प्राण वाचले. एका वैफल्यग्रस्त तरुणाने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जगायची इच्छा नाही’ असा मेसेज केला होता. या मेसेजबद्दल ग्रुपमधील स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी प्रसंगावधान राखून पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी त्या तरुणाच्या घरच्या पत्त्यावर तातडीने धाव घेतली. पण तो तिथे नव्हता. तरुणाचा मोबाईल नंबर घेऊन लोकेशन ट्रेस केले असता, तो तालुक्यातील कामार्ली येथे असल्याचे स्पष्ट झाले.
क्षणाचाही विलंब न लावता दीड तास शोधमोहिमेनंतर पोलीस तेथे पोहोचले; पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. त्यामुळे पोलिसांनी एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात शोध घेतला असता, तो सापडला. परंतु तो स्थिर नव्हता. त्यामुळे त्याला तातडीने पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.