नवी मुंबई: एनआरआय सागरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना बेलापूर येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून ४ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई युनिटने रंगेहाथ पकडले. सतीश कदम यांनी या बांधकाम व्यासायिकाला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून त्याच्याकडे ५० लाख रुपये लाचेची मागणी करून त्याच्याकडून १४ लाख रुपये उकळले होते. या कारवाईनंतर नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जुलै महिन्यामध्ये बेलापूर येथील शहाबाज गावात इंदिरा निवास इमारत कोसळली होती. या प्रकरणात एनआरआय पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक महेश कुंभारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी महेशला विविध गुन्ह्यात अडकवून त्याच्यावर गंभीर कलमे लावण्याची धमकी दिली होती. तसेच या प्रकरणातून वाचण्यासाठी कदम यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १८ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महेश यांचा मुलगा अजयने २३ सप्टेंबरला १२ लाख व २७ सप्टेंबरला दोन लाख रुपये सतीश कदम यांना दिले.
यादरम्यान, एनआरआय पोलिसांनी कुंभारविरोधात एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात देखील सतीश कदम यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती.