पालघर : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. अशातच पालघरमध्ये नॉट रिचेबल होण्याची मालिका सुरु झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा तिकीट न दिल्यामुळे दोन दिवस गायब झाले होते. आता पालघरमध्येच आणखी एक उमेदवार मागील 24 तासांपासून गायब असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर विधानसभेचे अपक्ष उमेदवार अमित घोडा 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. अमित घोडा भाजपमधून बंडखोरी करत पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वरिष्ठांकडून समजूत काढण्यासाठी फोन येत असल्याने अमित घोडा नॉट रिचेबल झाल्याची माहिती आहे. माजी खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात अमित घोडा यांची पालघर विधानसभेसाठी बंडखोरी केली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती.
अमित घोडा हे मागील शिवसेनेचे आमदार असून 2019 मध्ये उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना डहाणू किंवा पालघरची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी न देण्यात आल्याने अमित घोडा यांनी पालघर विधानसभेसाठी भाजपमधून बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडखोरी मोडीत काढण्यासाठी महायुतीकडून वरिष्ठ पातळीवरून सध्या बंडखोरांना फोनद्वारे संपर्क करण्यात येत आहे. मात्र, अशातच अमित घोडा आपला फोन स्विच ऑफ करून नॉटरिचेबल राहिल्याने माहितीची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
पालघर विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होती. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा हे दोन्ही सख्खे साडू निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार अमित घोडा यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यातच अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली असून बहुजन विकास आघाडी अमित घोडा यांना समर्थन देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून अमित घोडा यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अमित घोडा कुणाच्याही संपर्कात येत नसल्याचे चित्र आहे.