गुहागर : भाजप नेते निलेश राणे हे चिपळूणमधून येत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. ही दगडफेक ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरच झाल्याने त्यांना लक्ष्य केले जात आहे. ‘भास्कर जाधव यांनी आमच्या शेपटावर पाय ठेवला आहे. मी या जन्मात ही गोष्ट विसरणार नाही. मी आता तुम्हाला सोडणार नाही’, असा आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला.
गुहागर येथे शुक्रवारी झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. या सभेपूर्वी चिपळूणमधून येताना भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही दगड निलेश राणे यांच्या गाडीवर पडले. त्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘भास्कर जाधव यांनी यापुढे सभा घ्याव्यात. ते सभा घेतील, तिकडे मीदेखील सभा घेईन. पण तुम्ही राहिलात तर पुढची सभा होईल, असे म्हणत भास्कर जाधव विनाकारण सगळ्या सभांमध्ये नारायण राणे यांच्यावर टीका करत आहेत. आमच्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेऊ. पण राणे साहेबांविषयी वाकडंतिकडं बोलाल तर आम्ही खपवून घेणार नाही’.
तसेच भास्कर जाधव हे दोनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. पण 2004 मध्ये जेव्हा त्यांना उमेदवारी दिली नाही तेव्हा ते ‘मातोश्री’बाहेर रडत होते. त्यानंतर त्यांनी चिपळूणला येऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्या संपूर्ण निवडणुकीत भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.