रायगड: लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात असताना इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले सोमवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा देत सोमवारी पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले.
मुश्ताक अंतुले २२ एप्रिल रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करणार आहेत. मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अनेक कार्यक्रमांनिमित्त या दोन्ही नेत्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे असते.
असे असतानाच आता ऐन निवडणुकीच्या धामधूमित अंतुले राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करणार आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निधनानंतर मुश्ताक अंतुले यांनी बॅरिस्टर अंतुले यांचा राजकीय वारसा सांभाळला आहे. मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसचे काम करत आहेत. मात्र, आता अचानक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांचे राजकीय वारसदार आणि गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) April 21, 2024
मुश्ताक अंतुले हे अल्पसंख्याक समाजातून येतात. अंतुले यांच्या प्रवेशामुळे रायगड मतदारसंघातील अल्पसंख्याक मतदार महायुतीकडे वळविण्यात लाभ होईल, असे बोलले जाते. तसेच बॅरिस्टर अंतुले यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात असून त्याचा लाभ होईल, असे बोलले जात आहे.