रायगड : रायगड जिल्ह्यातल्या खोपोली शहरातील पटेलनगर भागात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका महिलेने चक्क नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्शद अली असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शद हा आपल्या पत्नी आणि मुलीसह गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात राहत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अर्शद आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होत होता. अर्शदचे बाहेर अनैतिक सबंध असल्याचे त्याच्या पत्नीला समजले. पतीच्या अनैतिक संबंधाच्या वादावरुनही दोघांमध्ये सतत भांडण होत असे. त्याच रागातून पत्नीने रात्री पती झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून पतीचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर गुन्हा व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांच्या शोधकार्यात श्वानाचा वापर करण्यात आला. त्यानंतर पतीचा खून करण्यासाठी वापरलेला दगड श्वानाने शोधून काढला. जेव्हा संशयास्पद दगड श्वानाच्याजवळ नेऊन हुंगण्यास आला. त्यानंतर अर्शदची पत्नीच खूनी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.