मुरुड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार सुनील तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅसच्या पार्लमेंटरी समितीच्या अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीत यश संपादन करून त्यांनी दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे. लोकांशी थेट संपर्क व त्यांच्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांचे कट्टर समर्थक असून सध्या ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रात एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण ३१ सदस्य असतात. यापैकी २१ लोकसभा आणि १० राज्यसभेचे सदस्य असतात.
पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस संबंधित एखादा विषय सभागृहात चर्चेला येणार असेल तर ही समिती त्या विषयाची तपासणी करून त्याचा अहवाल सभागृहाला सुपूर्द करण्याची जबाबदारी या समितीवर असते. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी सुनील तटकरे यांची वर्णी लागल्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.