सिंधुदुर्ग : राज्यभरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका दाम्पत्याचा वेदनादायी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शौचालयाच्या टाकीत पडल्याने महिलेने आपला जीव गमावला आहे. पत्नीचा मृतदेह पाहून पतीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि क्षणार्धात त्यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उषा बिपीन हडकर (वय 48) आणि बिपीन प्रभाकर हडकर (वय 51) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत. हे दोघेही मुंबईतील रहिवासी असून ते गणेशोत्सवानिमित्त मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा येथे आपल्या मूळ गावी आले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास उषा या घरातील शौचालयाच्या टाकीच्या भागात साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तोल जाऊन त्या टाकीत पडल्या. त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तरी पत्नी न आल्याने बिपीन यांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी त्यांना टाकीत उषा यांचा मृतदेह दिसून आला. पत्नीचा मृतदेह पाहून बिपीन यांना मोठा धक्का बसला आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव झटका येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घडलेला प्रकार लक्षात येताच बिपीन यांच्या आईने आरडाओरड केली. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मालवण पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मसुरे देऊळवाडा गावात धाव घेतली. उषा आणि बिपीन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. ऐन गणेशोत्सव काळात हडकर दाम्पत्याचा वेदनादायी अंत झाल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बिपीन हडकर यांच्या पश्चात मुलगा, आई असा परिवार आहे. मुंबईत काम करणाऱ्या या दाम्पत्याने ४ वर्षांपूर्वी तेथे घर विकत घेतले होते. गणेश चतुर्थीनिमित्त नव्या घराची पूजा करावी या हेतूने दोघेही गावाकडे गेले होते. मात्र, काळाने घात केला आणि दोघांनाही आपले प्राण गमावावे लागले.