ठाणे : लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या १२ हजार ६२६ घरांची विक्री प्रक्रिया सुरू आहे. मात्र कोकण मंडळाने जाहिरात काढताना तपशील दिलेले नसून त्याबाबत त्रुटी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे म्हाडा सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अर्जदारांना घरांची माहिती देण्यासाठी कोकण मंडळाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, घरांच्या जाहिरातीत घरांचा पूर्ण पत्ता नसल्याने अर्जदारांना घरांची निवड करताना अडचणी येत आहेत. विशेषतः जाहिरातीत केवळ इमारतीचे नाव आहे, सदनिकेचा क्रमांक नाही, अशा त्रुटी असल्याने घरांसाठी अर्ज करायचा कसा, याबाबत अर्जदारांमध्ये प्रश्नचिन्ह आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस अगोदर कोकण मंडळाने सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील ओरस, वेंगुर्ला व मालवण येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत १२,६२६ सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. यापैकी ११,१८७ सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्रीकरता उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या योजनेंतर्गत, ऑनलाईन नोंदणीनंतर, आधी घराची रक्कम जमा करणाऱ्या अर्जदाराला घराचे वाटप केले जाईल. घरांच्या संपूर्ण तपशीलाअभावी अर्जदारांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत घरे मिळू शकत नाहीत. कोकण मंडळ लॉटरी प्रक्रियेद्वारे १,४३९ घरे आणि ११७ भूखंडांची विक्री करणार आहे. या घरांसाठी अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. १,४३९ घरांची लॉटरी २७ डिसेंबर रोजी निघणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक आचारसंहितेपूर्वी म्हाडाने सोडतीसाठी घाईत घरांची निवड केली. मात्र, अर्जदारांना घराचा पत्ता आणि फ्लॅट क्रमांक देण्यास विसरल्याचे दिसून आले आहे. याबाबत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा योजनांसाठी कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर तत्काळ घरे देण्यात येणार असल्याचे म्हाडाने सांगितले आहे, तर इतर घरांची सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हाडाच्या माध्यमातून लवकरच अर्जदारांना माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.