रायगड : ”मराठा आरक्षणाबाबत जो काही अन्याय होत आहे, तो लढा आता शंभर टक्के पूर्ण होणार आहे. ज्याप्रमाणे मराठे स्वराज्यात एकवटले होते, त्याचप्रमाणे आता एकवटले आहेत. मुख्यमंत्री साहेब मराठ्यांच्या लेकरांना नक्कीच न्याय देतील”, अशी अपेक्षा मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी रविवारी (दि.19) येथे व्यक्त केली.(Maratha Reservation)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर आता ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ”मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर मराठा समाजाचा विश्वास आहे.(Manoj Jarange)
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन शपथ घेतल्याने त्यांच्यावर मराठा समाजाला अत्यंत विश्वास आहे. 24 डिसेंबरच्या आत मुख्यमंत्री साहेब मराठ्यांच्या लेकरांना नक्कीच न्याय देतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी देखील अनेक शब्द पाळले आहेत आणि आताही पाळतील अशी अपेक्षा आहे”.(eknath Shinde)
तसेच ते पुढे म्हणाले, ”मराठा समाजाचा आरक्षणाबाबतचा लढा खूप दिवसांपासून सुरु आहे. आता मराठा समाजाचे पुरावे देखील सापडले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा संयम न पाहता, तात्काळ 50 टक्क्यांच्या आत ओबीसीमधून सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं, अशी रायगडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती असणार आहे”.
शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद
”छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. या पवित्र भूमीची माती कपाळी लावली आहे. मराठा आरक्षणाबाबत जो काही अन्याय होत आहे, तो लढा आता शंभर टक्के पूर्ण होणार आहे. ज्याप्रमाणे मराठे स्वराज्यात एकवटले होते, त्याचप्रमाणे आता एकवटले आहेत. आज शिवरायांचा आशीर्वाद घेऊन लढाई यशस्वी करण्यासाठी निघालो आहोत”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.