रत्नागिरी: फेंगल चक्रीवादळामुळे राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती व आता काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे परिसरातील आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आंब्याचा गोडवा पण लांबणीवर जातो की काय अशी परिस्थिती आहे.
यंदा पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम होऊन आंब्यांची मोहोर प्रक्रिया लांबली आहे. दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा, तसेच लांबत असलेला पाऊस, वातावरणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते. मात्र, या वर्षी पावसाने नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. त्यातही फेंगल चक्रीवादळ यामुळे हंगामी पिकांना याचा फटका बसत असून आता चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंब्याला मोहोर येण्याऐवजी पानातील रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
साधारणतः नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होत असते. मात्र या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाहिजे तेवढी थंडी न पडल्यामुळे आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मोहोराला पोषक अशी थंडीचे वातावरण लाभल्यास मोहोर भरगच्च येतो. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जास्त असतो. परंतु, ऐनवेळी फुलण्याच्या वेळेला हवामानात झालेल्या बदलांमुळे आंब्याच्या मोहोराचे नुकसान होत आहे. त्यामुळे आंब्याचा गोडवा लांबणार असल्याचे चित्र आहे.