कर्जत: किरकोळ कारणांवरून कर्जत तालुक्यातील भावासह भावजय आणि लहानग्या पुतण्याचा निर्घणपणे खून करणाऱ्याला ३६ तासांनंतर पोलिसांनी गजाआड केले. हत्याकांडानंतर बदललेला टी-शर्ट पोलिसांसाठी सबळ पुरावा ठरला आणि आपल्याच भावाचे कुटुंब मिटवून टाकण्याचा विडा उचललेल्या सख्या भावाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. वडिलांनी बांधून दिलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावे करावा आणि रेशन कार्डमधील नाव वगळून नवे रेशन कार्ड काढता यावे, यासाठी हनुमंत जैतू पाटील याचा आग्रह सुरू होता. रेशन कार्ड स्वतःचे नसल्याने रेशनवरील धान्य मिळत नव्हते आणि आठ-दहा वर्षे त्यासाठी मागणी करूनदेखील मोठा भाऊ मदन जैतू पाटील रेशन कार्डवरील नाव कमी करू देत नव्हता.
तसेच घराचा अर्धा भाग नावावर करीत नव्हता, त्यामुळे परिपूर्ण नियोजन करून हनुमंत जैतू पाटील याने आपल्या राहत्या घरी गणरायांचे आगमन झाले असल्याचा मोका साधून मदन जैतू पाटील, माधुरी तथा अनिशा मदन पाटील आणि विवेक मदन पाटील यांचा खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी हनुमंत पाटील याने त्या तिघांचे मृतदेह घराच्या मागून वाहणाऱ्या वाहत्या पाण्याच्या नाल्यात फेकून दिले. रात्रभर पाऊस सुरू असल्याने ते मृतदेह चिल्हार नदीमध्ये वाहून जातील, असे वाटले होते.
हे सर्व कुभांड रचताना हनुमंत पाटील याने आपल्या पत्नीला मुलांसह माहेरी पाठवून दिले होते आणि घरात गणपती असल्याने मोठ्या भावाच्या घरात सहज प्रवेश मिळेल, असे वाटले होते. त्यासाठी ७ सप्टेंबर रोजी घरातून चुलत मामाकडे पोशीर गावी रात्री आठ वाजता पोहचला. तेथे गणपती जागवत बसलेल्या हनुमंतला त्यांच्या मामाने पाहिले होते. मात्र, मामाच्या घरातील सर्व झोपलेले बघून मध्यरात्रीनंतर हनुमंत आपल्या पोशीर पाडा येथील घरी पोहचला.
पाऊस पडत असल्याने अंधारात घरात घुसून लपवून ठेवलेल्या कुऱ्हाडीच्या सहाय्याने अडीच वाजण्याच्या सुमारास गाढ झोपेत असलेला भाऊ मदन पाटील यांचा खून केला. त्यावेळी मुलगा विवेक जागा झाला असता त्याला देखील मारले. नंतर अनिशा मदन पाटील यांना देखील ठार मारून जाड कपड्यात गुंडाळून त्यांचे मृतदेह घराच्या मागून वाहणाऱ्या नाल्यात टाकून घरी परतला. घरी आल्यावर घरातील सर्व रक्ताचे डाग पुसून टाकले आणि कपडे बदलून पुन्हा पोशीर गावी मामाच्या घरी गणपती जागवायला गेला. हाच हनुमंत सकाळी पोलिसांबरोबर मृतदेहाचे पंचनामे केले जात असताना तेथे उपस्थित होता. मात्र, संशयित म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नेरळ पोलीस, कर्जत पोलीस यांना सूचना करून समांतर तपास सुरू केला.
त्यात जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सूचना करून त्यांची टीम तपास कामी लावली. आरोपी हनुमंत याने पोशीर गावी मामाच्या घरी जाताना अंगात शर्ट घातला होता आणि पुन्हा पहाटे साडेपाच वाजता पोशीर गावी जाताना टी-शर्ट घातल्याचे श्रमजीवी विद्यामंदिर शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. या गुन्ह्याचा तपास करणारे सर्व पथके हतबल झाली होती. ३६ तासांचे अथक परिश्रम केले, त्या एका पुराव्यामुळे तिहेरी हत्याकांडाचा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. हा आरोपी आपल्या भावाला मारण्याचा गेले अनेक महिने तयारी करीत होता, त्यासाठी अभिनेता अजय देवगण याचा दृश्यम चित्रपट पाहुन रणनीती ठरवित होता.