रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी घटना समोर येत आहे. जयगडमधील जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वायुगळतीचा नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. जवळपास 35 ते 40 विद्यार्थ्यांना सदर वायुगळतीमुळे त्रास होत आहे. हा प्रकार आल्यानंतर सर्व बाधित विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यामधील काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय, तर काहींना खासगी रुग्णालयात उचारासाठी भरती करण्यात आले आहे.
जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वायू गळतीनंतर आता प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वायू गळतीचा परिणाम लहान मुलांवर झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, रत्निगिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यातही एका टँकरमधून गॅस गळती झाल्याची घटना घडली होती. टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने लागलीच नागरिकांकडे मदत मागितली होती. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी गॅस गळती थांबवली होती.