वसई: मित्रांसह सिंधुदुर्गात पर्यटनासाठी आलेल्या काही पोलिसांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला असून या साऱ्यांना बेदम चोपही दिला. या प्रकाराची गंभीर दखल घेत वसईच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या यापैकी दोन पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
हरीराम मारुती गीते (३५), माधव सुग्राव केंद्रे (३३), सटवा केशव केंद्रे (३२), श्याम बालाजी गीते (३५, सर्व रा. शेलाळी, कंदार, जि. नांदेड), शंकर संभाजी गीते (३२, रा. बदलापूर, ठाणे), प्रवीण विलास रानडे (३४, रा. वसई, पालघर) अशी संशयितांची नावे आहेत.
देवगड येथील येथील एका महाविद्यालयीन युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, एकूण सहा संशयित तरुणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. संशयितांमधील चारजण पोलीस सेवेत असून उर्वरित दोघे अन्य सेवेत असल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पीडित युवती महाविद्यालयातून मुख्य रस्त्यावरून आपल्या घरी जात असताना संशयित वाहनामधून जात होते. संशयितांपैकी काहींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पीडितेशी संवाद साधून असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडितेची टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्नही झाला. या छेड काढणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी संबंधित मुलीने आरडा-ओरडा केल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संशयितांपैकी काहींनी पळ काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र ग्रामस्थांनी त्यांना पकडले. आपल्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याने त्यांना यावेळी बेदम चोप देण्यात आल्याचे समजते. या साऱ्यांना देवगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. संशयितांपैकी चारजण’ पोलीस सेवेत आहेत. यातील तिघेजण राज्य पोलीस सेवेत, तर एकजण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात आहे.
उर्वरित दोघेजण अन्य सेवेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथे भेट देऊनही या घटनेची माहिती घेतली. रक्षण करणाऱ्या पोलिसांकडूनच हा गंभीर प्रकार झाल्याने त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून हा प्रकार कळल्यानंतर मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी पोलीस शिपाई हरिराम गीते आणि प्रवीण रानडे यांना तत्काळ निलंबित केले आहे.
देवगड पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी गीते, रानडे यांच्या व्यतिरिक्त आणखी एकजण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि दुसरा राज्य राखीव पोलीस (एसआरपीएफ) दलात कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान प्रकरणात आमदार नितेश राणे यांनीही लक्ष घातले असून त्यांनी पोलिसांना अधिक दक्षता घेण्याची आणि आवश्यक असल्यास त्यासाठी सीसीटीव्हीचा वापर करण्याची सूचना दिली आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे स्वागत आहे; पण त्यांनी नको ती मस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास काय परिणाम होतात, याचीही त्यांनी गंभीर नोंद घ्यावी, असाही इशारा त्यांनी या निमित्ताने दिला आहे.