सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुक तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान कुडाळ- मालवण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीनंतर कुडाळ तहसील कार्यालय येथे दोन गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष वैभव जयराम नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान आज (बुधवारी) प्रांत कार्यालय येथे अर्जाची छाननी होती. या छानणीमध्ये अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांच्या अर्जावरील सूचकापैकी जयराम प्रदीप नाईक यांची या अर्जावरील सही त्यांनी केली नाही. अशी हरकत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रतिनिधींनी घेतली.
या हरकतीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी याबाबत सही करणारे जयराम नाईक यांना प्रतिज्ञापत्र देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार जयराम नाईक हे आपले प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी तहसिल कार्यालय येथे गेले होते तेव्हा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाला. कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हा वाद मिटविला.