शहापूर (ठाणे) : तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत हद्दीतील तासपाडा आदिवासी वस्तीतील १४ जणांना प्रसादातून विषबाधा झाल्याने त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर वाटण्यात आलेल्या बुंदीच्या प्रसादातून ही विषबाधा झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे असले, तरी वैद्यकीय निष्कर्षानुसार विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर बुंदीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. बुंदी खाल्ल्यानंतर काही जणांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला. यापैकी १४ जणांवर उपचार करण्यात आले, त्यापैकी ८ जणांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात अद्याप उपचार सुरू असून, एकजण खाजगी तर आणखी एकाला जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने पंचनामा करून फूड सॅम्पल तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रुपाली शेंडगे यांनी दिली.